नर मादी कशासाठी? - डॉ. मिलिंद वाटवे
(जानेवारी 95)
एके
काळी जीवशास्त्राचे शिक्षक विद्यार्थ्यांना असं सांगत असत की जीवशास्त्रात ‘का’ हा प्रश्न विचारायचा नाही. जे आहे ते तसं आहे. तसंच का आहे हे काही सांगता
येत नाही. आज ही परिस्थिती बदलली आहे, बदलते आहे. अर्थात सगळ्या प्रश्नांची उत्तरे
आपल्याकडे नाहीत. पण आता प्रश्न विचारण्याच्या आणि त्यांची उत्तरं शोधण्याच्या
वैज्ञानिक पद्धती रूढ झाल्या आहेत.
आपण
नर-मादी संबंधांविषयी बोलत असू तर पहिला प्रश्न असा विचारला पाहिजे की मुळात
नर-मादी का निर्माण झाले? या प्रश्नाला विशेष महत्त्व आहे. याचं कारण असं
की ज्या जातींमध्ये नर-मादी अशी व्यवस्था असते, त्या जातींमध्ये निम्मेच प्राणी पिलांना
जन्म देतात. उरलेले निम्मे म्हणजे नर तसं फारसं काहीच करत नाहीत. खालच्या
प्राणीवर्गांमध्ये पिलांची काळजी घेतली जात नाहीच.
म्हणजे त्यात नराच्या सहभागाचा प्रश्नच नसतो. थोडक्यात,अंडी
फलित करण्यापलिकडे नरांना काही काम नसतं. आणि शुक्रजंतू तयार करणं हे काही फार
खर्चाचं अथवा कष्टाचं काम नाही. याउलट अंडी घालणं खर्चाचं आहे. प्रत्येक
अंड्यामध्ये जीवाची वाढ होण्यासाठी पुरेसा अन्नाचा साठा लागतो. तो मादीलाच पुरवावा
लागतो. म्हणजे, एका पिलामागे नराची जेवढी भांडवली गुंतवणूक असते
त्याच्या कित्येक पटींनी मादीची असते. म्हणजे पिलं किती होणार हे मादीच्या
क्षमतेवर अवलंबून आहे. नरांच्या नाही.
आता समजा, नर-मादी अशी व्यवस्था नसतीच, किंवा नरांशिवायच माद्या पिलांना जन्म देऊ शकत असत्या, तर काय झालं असतं? तर मग या प्राणिजातीत प्रत्येक प्राणी पिलांना जन्म देऊ शकतो. त्यामुळे या प्राण्याच्या वाढीचा वेग जास्त असणं स्वाभाविक आहे. मग उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार अशी पद्धत टिकली पाहिजे. नर-मादी व्यवस्था नामशेष झाली पाहिजे. प्रत्यक्षात असं झालेलं दिसत नाही.
हे उदाहरण काल्पनिक नाही. नर-मादी व्यवस्था नसलेले प्राणी आज आहेतच. त्या खेरीज, मादीवीण (parthenogenesis) नावाचा प्रकारही अनेक प्राण्यांमध्ये दिसतो. यामध्ये मादी नराशिवायच पिलं घालते आणि ही पिलं फक्त माद्याच असतात. नर मिळाला तर या माद्या जुगतातही. त्यातून निर्माण झालेल्या संततीत नर पिलं आणि मादी पिलं दोघंही असतात. पण नर नसतील तर मादीवीण चालू राहते. म्हणजे नर-मादी व्यवस्था नसली तरी चालू शकतं. हे शक्य आहे, आणि निसर्गात तशी उदाहरणंही आहेत. मग हे जर शक्य असेल तर आपलं तर्कशास्त्र असं सांगतं की निसर्गाच्या स्पर्धेमध्ये हे प्राणी जिंकले पाहिजेत आणि नर मादी व्यवस्था असलेले प्राणी हरले पाहिजेत. असं झालेलं तर दिसत नाही. तेव्हा याचा अर्थ नर-मादी व्यवस्थेत काही जबरदस्त फायदे असले पाहिजेत. एरवी वीणीसाठी निम्मे प्राणी नालायक आहेत हा मोठा तोटा पचवून ही व्यवस्था जिवंत राहिली नसती. लैंगिक पुनरुत्पत्ती अथवा मिथुनवीण (sexual reproduction) कशी निर्माण झाली आणि कशी आणि का टिकून राहिली या संबंधीचे अनेक तर्क मांडले गेले आहेत, जात आहेत. यात 1980 साली मांडला गेलेला विचार आज सर्वाधिक मान्यता पावलेला आहे.
प्रत्येक प्राण्याला अनेक प्रकारचे रोगजंतू आणि परजीवींना तोंड देण्याचा प्रसंग नेहेमी येत असतो. शरीर रोगजंतूंपासून बचाव करण्यासाठी नानाविध उपाय करत असतं. याउलट रोगजंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीवर मात करण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत असतात. प्राणी आणि रोगजंतूंचं उत्क्रांतीयुद्ध कोट्यवधी वर्षं चालत आलेलं आहे आणि चालत राहील. ‘उत्क्रांतीयुद्ध’ असा शब्द वापरण्याचं कारण रोगजंतूंमध्ये प्राण्यांच्या प्रतिकारशक्तीवर मात करण्याच्या नव्या नव्या तर्हा उत्क्रांत होत असतात. तसंच प्राण्यांमध्ये प्रतिकाराच्या नवीन पद्धती, नव्या प्रकारचे रेणूही उत्क्रांत होत असतात. आता उत्क्रांती ही काही एका पिढीत घडून येणारी गोष्ट नाही. अनेक पिढ्यांमागे थोडासा बदल होताना दिसतो. आणि हीच रोगजंतूच्या उघड उघड फायद्याची गोष्ट आहे. प्राण्यांच्या एका पिढीत जंतूंच्या शेकडो पिढ्या होऊ शकतात. त्यामुळे या उत्क्रांतीयुद्धात रोगजंतूचा विजय जवळजवळ निश्चित आहे.
हे टाळायचं असेल तर काहीतरी करून प्राण्यांना आपल्या शरीरात बदल घडवून आणण्याचा वेग वाढवला पाहिजे. मिथुनवीण हे काम करते. नर-मादीच्या समागमामुळे त्यांना होणारी पिलं पूर्णपणे त्यांच्या आईसारखीही नसतात आणि बापासारखीही नसतात. परिणामतः रोगजंतूंना प्रत्येक पिढीत वेगळ्या प्रतिकारशक्तीला तोंड देणं भाग पडतं. रोगप्रतिकार नियंत्रण करणारे अनेक जनुक शरीरात असतात. प्रत्येक पिढीत वेगळे जनुक समोर असल्यामुळे रोगजंतूंना तोडीस तोड उत्तर मिळू शकतं. उत्क्रांतीच्या वेगामुळे रोगजंतूंकडे झुकलेला काटा मिथुनवीण पुन्हा फिरवू शकते.
म्हणजे मिथुनवीण विरुद्ध मादीवीण यांच्यातल्या स्पर्धेचा आपण पुन्हा विचार केला तर असं वाटतं की मादीवीण करणारे प्राणी जास्त वेगाने वाढतीलही, पण लवकरच एखाद्या रोगाची साथ त्या आख्ख्या जातीलाच विळखा घालेल. या उलट मिथुनवीण विणारे प्राणी हळू वाढतील पण त्यांना रोगाचा धोका तुलनेनं कमी असेल. त्यामुळे अंतिमतः जय त्यांचाच होईल.
रोगजंतू आणि मिथुनवीण यांचा संबंध जोडणार्या या सिद्धांताला आज वाढत्या प्रमाणावर मान्यता मिळत आहे. पण नर-मादी व्यवस्थेचं हे पुरेसं स्पष्टीकरण आहे का?
मला वाटतं की नाही. हे
स्पष्टीकरण मिथुनवीणीचं झालं. नर-मादी संबंधाचं नाही. मिथुनवीण होण्यासाठी नर-मादी
अशा दोन लिंगांची आवश्यकता आहे का?
या प्रश्नाचं खूप जणांना आश्चर्य वाटेल. कुणाला तो मूर्खपणाचाही वाटेल. याचं कारण आपल्या मनातील लैंगिक पुनरुत्पत्तीची कल्पना नर मादीशी अगदी घट्ट जोडली आहे. पण आपले पूर्वग्रह सोडून आपण विचार करू लागलो तर नर-मादी व्यवस्थेला पर्याय असू शकतात हे सहजपणे लक्षात येईल. 1987 साली ‘the evolution of number of sexes’ अशा मथळ्याचा एक निबंध प्रसिद्ध झाला. त्याच्या लेखकानं हाच प्रश्न उभा केला होता की नर-मादी अशी दोनच लिंगं का असावीत? तीन का नाही? तीनापेक्षा जास्त का नाही? तीन लिंग याचा अर्थ, समजा क, ख आणि ग अशी तीन लिंगं आहेत तर ‘क’चा ‘ख’शी, ‘ख’चा ‘ग’शी अथवा ‘ग’चा ‘क’शी समागम होऊन त्यातून पिलं होऊ शकतात. ही कल्पना शेवटाला नेऊन आपण असं चित्र डोळ्यासमोर आणू शकतो की एका जातीतला कोणताही एक प्राणी कोणत्याही दुसर्या प्राण्याशी समागम करून पिलं जन्माला घालू शकतो. त्यासाठी एक नर, एक मादी असण्याची गरज नाही.
ही गोष्ट काही पूर्णपणे
काल्पनिक नाही. गांडुळासारख्या काही प्राण्यांमध्ये आणि फुलं येणार्या बहुतेक
वनस्पतींमध्ये एका वेगळ्या प्रकारानी असंच घडत असतं. गांडुळांमध्ये प्रत्येक
प्राण्यामध्ये नराचे आणि मादीचे असे दोन्ही अवयव असतात. त्यामुळे कोणतेही एक
गांडुळ दुसर्या एका गांडुळाबरोबर समागम करू शकतं. गांडुळांसारखं उभयलिंगी
असण्याचा दुसराही एक मोठा फायदा असतो, तो म्हणजे प्रत्येक प्राणी अंडी घालतो. नर-मादी
व्यवस्थेसारखी अर्धी लोकसंख्या वाया जात नाही. म्हणजे मिथुनवीणीचा फायदा तर आहे
आणि नर-मादी व्यवस्थेचा तोटा नाही. या अशा उभयलिंगी अथवा अलिंगी मिथुनवीणीला खरं तर आदर्श मानायला
हवं आणि हीच पद्धत सर्व प्राण्यांमध्ये उत्क्रांत व्हायला हवी.
पण असं झालेलं दिसत नाही.
प्राण्यांमध्ये नर-मादी व्यवस्था सर्वाधिक जातींमध्ये दिसते,
उभयलिंगी थोड्या, असं का असावं? दोनच लिंगंं का? आणि ती वेगळी का? या मागे काही निराळी तत्त्व
काम करत असली पाहिजेत.
एका अगदी साध्या एकपेशीय
प्राणीजातीची कल्पना करा.
या जातीचे अनेक प्राणी विखरून
राहिले आहेत. त्यापैकी कुठलाही एक प्राणी कुठल्याही दुसर्या प्राण्याशी समागम करू
शकतो. आता मिथुनवीण होण्यासाठी दोन प्राण्यांनी तरी एकत्र यायला पाहिजे. दुसरं
म्हणजे पिलांच्या वाढीसाठी पुरेसा अन्नसाठा करून ठेवला पाहिजे. या दोन्ही गोष्टी
सारख्याच महत्त्वाच्या आहेत. जोडीदार शोधण्यासाठी हिंडण्याचीही आवश्यकता आहे आणि
अन्नाचा शक्य तितका मोठा साठाही करून ठेवला पाहिजे. या दोन गोष्टी एकमेकांच्या
विरोधी आहेत. कारण अन्नाचा साठा वाढवला तर वजन वाढेल. हिंडणं कठीण होत जाईल.
हिंडायचं म्हटलं तर सामान वाढवणं परवडत नाही. मध्यममार्ग काढायचा तर अशी शक्यता
आहे की धड हे ही साधणार नाही नि तेही. मग शहाणपणाची गोष्ट ही की एकतर मी पुरेसा
अन्नसाठा करून एका जागी बसावं आणि आपण दुसर्याला शोधण्याऐवजी दुसरं कोणी आपल्याला
शोधत येईल त्याची वाट पाहावी. किंवा अन्नसाठा करण्याच्या भनगडीत न पडता सडं
हिंडावं आणि अन्नसाठा केलेल्या जोडीदाराचा शोध घ्यावा.
म्हणजे मुळात कुणीही कुणाशी
जुगावं अशी व्यवस्था असलेल्या साध्या प्राण्यांमध्येही कामाच्या विभागणीतून दोन
वेगळ्या पण परस्परपूरक वागणुकीचे प्रकार निर्माण होऊ शकतात. यालाच आपण नर-मादी
म्हणतो. अथवा अंडं आणि शुक्रजंतू म्हणतो. अन्नसाठा करणारं ते अंडं आणि शोध
घेण्यासाठी प्रवास करणारा तो शुक्रजंतू. या ध्रुवीकरणामुळे शेवटी दोनच लिंग उरतात.
हे झालं पेशीच्या पातळीवर. मोठ्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये नर-मादी वेगळे का झाले? एकाच प्राण्यानं अंडंही तयार करायचं आणि शुक्रजंतूही करायचे अशी व्यवस्था काही प्राण्यांमध्ये राहिली, काहींमध्ये नाही, असं का असावं?
याचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा एक काल्पनिक प्रयोग करू. समजा एक उभयलिंगी प्राणीजात आहे. या जातीतल्या प्रत्येक प्राण्यामध्ये नर अवयव आणि मादी अवयव असे दोन्ही आहेत. त्यामुळे कोणतेही दोन प्राणी एकत्र येऊ शकतात आणि आपल्यातले शुक्रजंतू दुसर्याच्या अंड्याला देऊ शकतात. आता समजा या जातीत गुणघाता (mutation) मुळे एक असा प्राणी तयार झाला की जो फक्त शुक्रजंतू तयार करतो, अंडी नाही, तर काय होईल? या प्राण्याला अंड्यांमध्ये जी मोठी भांडवली गुंतवणूक असते ती करावी लागणार नाही. पण शुक्रजंतूंच्या द्वारे त्याची जनुकं पुढल्या पिढीत जात राहतील. म्हणजे या लबाड नराचा बिनभांडवली तेजीचा धंदा झाला. साहजिकच उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार या नराचा वंश वाढेल. यातून मुळात उभयलिंगी असलेल्या प्राणिजातीत अनेक नर तयार होतील. पण नरांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली की वाढत्या स्पर्धेमुळे नरपणाचा फायदा कमी कमी होत जाईल. आता उरलेल्या उभयलिंगी प्राण्यांना शुक्रजंतू तयार करण्याचा काहीच फायदा राहणार नाही. त्यापेक्षा फक्त अंडी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरेल. त्यातूनच माद्यांचा जन्म होईल.
म्हणजे एकूण प्राणीजातीच्या
हिताचा विचार केला तर नर-मादी व्यवस्थेपेक्षा उभयलिंगी असणं हिताचं आहे. पण
व्यक्तिशः एकेका प्राण्याच्या हिताचा विचार केला तर उभयलिंगी
असण्यापेक्षा नर होणं फायद्याचं आहे. पण नर आधीच खूप असले तर मादी होणं फायदेशीर
आहे. इथं ‘फायदा’ किंवा ‘हित’ याचा अर्थ तुमचा वंश किती वाढतो. किंवा तुमचे जनुक पुढच्या पिढीत किती प्रमाणात जातात त्याचा हिशेब. प्राण्यांचा जो गुणधर्म या
दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतो तो टिकतो, जो कमी फायदा देतो तो नामशेष होतो. आणि फायद्याचा हा
जो हिशेब होतो तो व्यक्तिच्या किंवा एकेका जनुकाच्या पातळीवर. त्यामुळे उभयलिंगी
व्यवस्था अख्ख्या प्राणिजातीच्या हिताची असली तरी नर-मादी व्यवस्था व्यक्तीच्या
अधिक फायद्याची असल्यामुळे ती उत्क्रांत होऊ शकते.
आता तुम्ही उलटा प्रश्न
विचाराल की जर असं असलं तर काही प्राणी आणि फुलं येणार्या बहुतेक वनस्पतींमध्ये
तरी ही उभयलिंगी व्यवस्था का टिकून राहिली? यालाही तर्कशुद्ध कारण देता येतं. आपण वर म्हटलं की
नरपणा हा जवळजवळ बिनभांडवली व्यवसाय आहे. पण सर्वच परिस्थितीत तो जास्ती फायद्याचा
ठरेल असं नाही. तो फायद्याचा ठरण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे अंडी न
घालण्यात भांडवली गुंतवणूक वाचली तरी त्याबरोबर तुम्हाला पिलं होण्याचा दोनापैकी
एक मार्ग बंद होत असतो. आता दुसरा मार्ग दुपटीनं भरपाई करू शकत असेल तर ठीक.
नाहीतर दोन्ही मार्ग चालू ठेवण्यातच हित आहे. नराची एका पिलामागची गुंतवणूक कमी
असते. पण इथे वाचवलेलं भांडवल इतर अनेक ठिकाणी गुंतवण्याची संधी असेल तरच नरपणात
फायदा आहे. तशी संधी नसेल तर नर होण्यापेक्षा उभयलिंगी झालेलं चांगलं. ही संधी
मिळणं न मिळणं हे प्रत्येक प्राण्याची परिस्थिती आणि जीवनपद्धती यावर अवलंबून
असतं. उदाहरणार्थ, गांडूळ हा जमिनीतला आंधळा प्राणी. दोन प्राणी जेव्हा
योगायोगानं एकत्र येतात तेव्हा समागम होतो. एखाद्या गांडुळानी नर व्हायचं ठरवलं तर
तो थोडं भांडवल वाचवेल. पण समागम ही योगायोगाची घटना असल्यामुळे गुंतवणुकीच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे
नरपणापेक्षा उभयलिंगी असणं फायद्याचं. वनस्पतींमध्येही पराग आणि बीजांडाचा संयोग
होणं ही योगायोगाची गोष्ट असते. त्यामुळे उभयलिंगीपणाच फायद्याचा. याउलट जे प्राणी
आपल्या विकसित ज्ञानेंद्रियांच्या आणि चपळ चलनेंद्रियांच्या मदतीने जोडीदाराचा
शोध घेऊ शकतात त्यांच्यामध्ये नरपणा आणि पर्यायाने मादीपणा फायद्याचा ठरतो. पक्षी
आणि सस्तन प्राणी या सर्वाधिक विकास झालेल्या प्राणीशाखांमध्ये आज नर-मादी
व्यवस्था पूर्णपणे स्थिरावलेली दिसते. त्यामुळे परिस्थितीनुरुप प्राण्यांच्या
उत्क्रांतीच्या काही शाखांमध्ये उभयलिंगी तर काही शाखांमध्ये नर-मादी व्यवस्था
स्थिरावलेली दिसून येते.
नर-मादी व्यवस्था अस्तित्वात
येण्याची कारणं थोडक्यात अशी आहेत. सर्वप्रथम अंडं आणि शुक्रजंतू वेगळे होण्यामागे
कामाच्या विभागणीचं तत्त्व आहे. आणि ही विभागणी विषम आहे. एकाची भांडवली गुंतवणूक
जास्त तर दुसर्याची कमी. जास्त भांडवल गुंतवणार्याला आपण म्हणतो ‘मादी’. कमी
गुंतवणार्याला आपण म्हणतो ‘नर’. गुंतवणूक कमी अधिक असल्यामुळे मुळातच नराचे हितसंबंध
वेगळे आणि मादीचे वेगळे असणं साहजिक आहे. या मूळ तत्त्वाला परिस्थितीमुळे अनेक
फाटे फुटले आहेत आणि यातून नर-मादी संबंधांचे नानाविध प्रकार तयार झाले आहेत.
नरपणा आणि मादीपणा हे जसे एकमेकांच्या विरोधी तसेच एकमेकांना पूरक आहेत,
एकमेकांना मदत करणारे आहेत तसेच एकमेकांवर कुरघोडी करू पाहणारेही. या नरपणा आणि
मादीपणाच्या खेळामधूनच मोराचा पिसारा, सिंहाची आयाळ, हतीचे सुळे आणि कदाचित माणसाच्या बुद्धिमत्तेचाही
जन्म झाला आहे.
Comments
Post a Comment