नर मादी कशासाठी? - डॉ. मिलिंद वाटवे
( जानेवारी 95 ) एके काळी जीवशास्त्राचे शिक्षक विद्यार्थ्यांना असं सांगत असत की जीवशास्त्रात ‘ का ’ हा प्रश्न विचारायचा नाही. जे आहे ते तसं आहे. तसंच का आहे हे काही सांगता येत नाही. आज ही परिस्थिती बदलली आहे , बदलते आहे. अर्थात सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत. पण आता प्रश्न विचारण्याच्या आणि त्यांची उत्तरं शोधण्याच्या वैज्ञानिक पद्धती रूढ झाल्या आहेत. आपण नर-मादी संबंधांविषयी बोलत असू तर पहिला प्रश्न असा विचारला पाहिजे की मुळात नर-मादी का निर्माण झाले ? या प्रश्नाला विशेष महत्त्व आहे. याचं कारण असं की ज्या जातींमध्ये नर-मादी अशी व्यवस्था असते , त्या जातींमध्ये निम्मेच प्राणी पिलांना जन्म देतात. उरलेले निम्मे म्हणजे नर तसं फारसं काहीच करत नाहीत. खालच्या प्राणीवर्गांमध्ये पिलां ची काळजी घेतली जात नाहीच. म्हणजे त्यात नराच्या सहभागाचा प्रश्नच नसतो. थोडक्यात , अंडी फलित करण्यापलिकडे नरांना काही काम नसतं. आणि शुक्रजंतू तयार करणं हे काही फार खर्चाचं अथवा कष्टाचं काम नाही. याउलट अंडी घालणं खर्चाचं आहे. प्रत्येक अंड्यामध्ये जीवाची वाढ होण्यासाठी पुरेसा अन्नाचा साठ...