प्राण्यांमधला माणूस आणि माणसातला प्राणी - डॉ.मिलिंद वाटवे
(दिवाळी 94)
ती धडपड करते आहे. त्याची पकड आणखी घट्ट होत जाते. त्याला दूर लोटण्याचा, त्याच्या पकडीतून सुटण्याचा ती जिवापाड प्रयत्न करते. तोही सर्व ताकदीनिशी आपली पकड कायम ठेवतो. हळूहळू तिच्या विरोधाची धार कमी होत जाते...
ती धडपड करते आहे. त्याची पकड आणखी घट्ट होत जाते. त्याला दूर लोटण्याचा, त्याच्या पकडीतून सुटण्याचा ती जिवापाड प्रयत्न करते. तोही सर्व ताकदीनिशी आपली पकड कायम ठेवतो. हळूहळू तिच्या विरोधाची धार कमी होत जाते...
हे ‘तो’ आणि ‘ती’ आहेत बेडकांच्या एका जातीतले. या
बेडकांची रीतच अशी. मादी अंडी घालेपर्यंत नर तिला चिकटून राहतो. कधी कधी एका
मादीला दोन–तीन नर सुद्धा झोंबून राहिलेले असतात. एकदा अंडी फलित झाली की नरांचं
काम झालं. ते त्या मादीला सोडून जातात. बेडकांमध्ये नर मादीपेक्षा लहान असतात.
गॅमॅरस
नावाचा पाणपिसूच्या जातीचा एक प्राणी आहे. त्यांच्यात नर मादीपेक्षा मोठा असतो. मादी सापडली की नर तिला धरूनच ठेवतो.
तिच्यावर पूर्ण कब्जा करतो. अंडी घालण्याच्या वेळेपर्यंत. एकदा अंडी घालून झाली की
तो त्या मादीला सोडून देतो. दुसर्या मादीचा शोध करतो.
डासांच्या काही जातींमध्ये असा प्रकार दिसतो.
डासांच्या चार अवस्था असतात. त्यापैकी अंडी, अळी, कोश या अवस्था पाण्यात असतात. आणि शेवटी प्रौढ प्राण्यांना पंख असतात. काही जातींमध्ये प्रौढ नर संध्याकाळच्या वेळेला, ज्यावेळी कोश फुटून प्राणी बाहेर पडण्याची वेळ असते, अशा वेळी पाण्याच्या पृष्ठभागावरच घुटमळत राहतात. एखादी मादी बाहेर पडू लागली की ती पूर्णपणे बाहेर येऊन उडू लागण्यापूर्वीच तिच्याशी जुगतात. काही
वेळा तर या नर डासांना इतकी घाई झालेली असते की बाहेर आलेला प्राणी नर आहे की मादी
हे न पाहताच ते त्याच्याशी झोंबू लागतात.
वरच्या
या उदाहरणांमध्ये नराची निवड करण्याचं स्वातंत्र्य माद्यांना अर्थातच राहत नाही.
मादीची इच्छा असो वा नसो नरानी तिच्यावर कब्जा केलेला असतो. पण याच्या अगदी
विरुद्ध टोकाची उदाहरणंही आहेत.
शेरटा नावाचा एक पक्षी आहे. याच्या
नरांना सिंहासारखी आयाळ असते. ती रंगीबेरंगी असते. विणीच्या हंगामात काही ठराविक
जागी अनेक नर एकत्र येऊन नाच करतात. आपला पिसारा फुलवून दाखवतात. माद्या येऊन
‘विंडो शॉपिंग’ करतात. जो नर सर्वात आवडेल त्याच्याशी जुगतात आणि
निघून जातात. आकर्षक नरांना डझनानी प्रेमिका मिळतात. दुर्दैवी किंवा खुडुक पिसार्याचे
नर उपाशी राहतात. पक्ष्यांच्या अनेक जातींमध्ये अशी व्यवस्था असते. सगळ्यांमध्ये
इतकं उघड उघड ‘विंडो शॉपिंग’ असेलच असं नाही. पण माद्यांना नर निवडण्याचं कमी अधिक
स्वातंत्र्य असतं. मग माद्यांनी आपलीच निवड करावी यासाठी नरांना आकर्षक पिसारे
असतात, वेधून घेणारे रंग असतात. नाहीतर आयाळ, सुळे, शिंगं यासारखं काहीतरी असतं.
नराच्या यापैकी कुठल्यातरी वैभवाकडे पाहून माद्या त्यांची निवड करतात असे स्पष्ट
पुरावे काही जातींमध्ये सापडले आहेत. इतर जातींमध्ये असंच होत असावं हा अंदाज.
गंमत म्हणजे ज्या जातींमध्ये नर खूप आकर्षक असतो त्या जातींमध्ये माद्या बहुधा अगदीच
अनाकर्षक, मळकट रंगाच्या असतात. याचं कारण या जातींमध्ये अंडी-पिलांची काळजी घ्यायचं
काम मुख्यतः मादीकडेच असतं. मादी आकर्षक रंगाची असेल तर शिकारी
प्राण्या-पक्ष्यांचं लक्ष वेधून धोकाच निर्माण व्हायचा. हा धोका टाळण्यासाठी नर
अंडी-पिलांपासून लांबच राहिलेला चांगला. साहजिकच ज्या जातींमध्ये माद्यांना
नराच्या निवडीची जास्तीत जास्त संधी असते त्या जातींमध्ये मादीला एकटीलाच संसाराचा
सगळा भार पेलावा लागतो.
पण हा
प्राणिजगताचा नियम आहे असं काही म्हणता येत नाही. कारण याच्या उलट टोकाची उदाहरणंही
बरीच आहेत. धनेश, गरूड अथवा करकोच्यांच्या सर्व जातींमध्ये नर-मादी दोघंही जोडीनं
पिलांसाठी कष्ट घेतात. ‘नाराच’ गरूडाच्या एका घरट्याचा मी आणि माझ्या काही तरूण
मित्रांनी सतत पाच वर्षं अभ्यास केला. या जातीत अंडी उबवण्याचा काळ सव्वा
महिन्याचा असतो. हा सव्वा महिना आणि पिलं दहा दिवसांची होईपर्यंतचा काळ मादी
दिवसरात्र घरट्यावरच बसून राहते. नर शिकार करून आणून तिला खाऊ घालतो. आमच्या
पाहण्यात मादीनं स्वतः शिकार करण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. कधी कधी
संध्याकाळचा एक अर्धा तास मादी जरा पंख मोकळे करायला बाहेर पडली. त्या वेळी नर
घरट्यावर अंडी उबवत बसला.
धनेश
पक्ष्यामध्ये याच्या पुढची पायरी दिसते. धनेशाची घरटी झाडाच्या ढोल्यांमध्ये
असतात. अंडी घालायची वेळ आली की मादी घरट्यात जाऊन बसते. नर घरट्याच्या ढोलीचं दार
मातीनं लिंपून जवळ जवळ बंद करतो. चोच बाहेर काढण्यापुरतीच जागा राहते. मग अंडी
उबवून, ती फुटून त्यातून बाहेर आलेली पिलं मोठी होईपर्यंत मादी घरट्यातच राहते.
सर्वांना पुरेल एवढं अन्न गोळा करून आणण्याचं काम नर एकटा करतो.
त्याच्याही पुढची पायरी म्हणजे दुर्लाव अथवा लाल पाणलाव पक्ष्यांमध्ये मादी अंडी घालून निघून जाते. अंडी आणि पिलांची सगळी उस्तवार नर करत राहतो. दरम्यानच्या काळात जमलं तर मादी दुसरा नवरा गटवते. गंमत म्हणजे लाल पाणलावींमध्ये नर मळक्या रंगाचे तर मादी लाल रंगाची असते. याउलट सिंहांमध्ये शिकारीचं आणि बालसंगोपनाचं काम फक्त सिंहिणी करतात. सिंह ऐतखाऊ असतात.
छोट्या-मोठ्या
कळपांनी राहणार्या अनेक प्राण्यांमध्ये एखादा प्रबळ नर अनेक माद्यांचा जनानखाना
बाळगून असतो. तर याउलट रानकुत्र्यांसारख्या काही प्राण्यांमध्ये एक द्रौपदी पाच
पांडव असंही दिसतं. मागे एकदा मदुमलाईच्या जंगलात मी दोन भांगपाड्या माकडांना
जुगताना पाहिलं. दोन-तीन फोटो घेतले. काही सेकंदातच ती दोन्ही माकडं निघून गेली.
नंतर फोटो पाहताना लक्षात आलं की ते दोन्ही नरच होते. म्हणजे आपल्या भाषेत ते homosexual behavior होतं. पुढे वाचनात आलं, माकडं, रानकुत्री,
चित्ते अशा काही प्राण्यांमध्ये नर-नराचं असं खोटं जुगणं (pseudo-mounting) अधूनमधून दिसतं. काही अभ्यासकांच्या मते,
आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा हा मार्ग असतो. दुसर्या नराला काही क्षणांपुरती
प्रतिकात्मक मादीची पोझ घ्यायला लावणं म्हणजे त्याच्याकडून आपलं वर्चस्व मान्य
करून घेणं. प्राणी अभ्यासकांनी लावलेला अर्थ बरोबर असेल तर
या जातीमध्ये ‘नरपणा’ हे वर्चस्वाचं प्रतीक आहे. याउलट त्या ‘नाराच’ गरूडाचा
अभ्यास करताना मला असं स्पष्ट जाणवत होतं की तो गरूड त्या गरूडीणीच्या अगदी
अर्ध्या वचनात होता. कधी कधी मारलेली शिकार ती त्याच्याकडून काढूनच घ्यायची आणि तो
निमूटपणे द्यायचा.
ही अशी
सगळी वरकरणी तरी परस्परविरोधी उदाहरणं पाहिली की असा प्रश्न पडतो की निसर्गात नर –
मादी संबंध असे असे असतात असं काही सूत्र
रुपानं सांगणं शक्य आहे की नाही? हा प्रश्न अनेक दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आज
स्त्रीवादी चळवळ सगळ्या जगात जोर धरत आहे. याचा परिणाम म्हणून
उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांनीही स्त्री–पुरुष संबंधाच्या उत्क्रांतीवर
आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. मानवी व्यवहारात जेव्हा एखादा वादाचा मुद्दा उभा
राहतो तेव्हा नैसर्गिक काय आहे आणि मानवनिर्मित, कृत्रिम अथवा लादलं गेलेलं काय
आहे, या प्रश्नाला महत्त्व येतं. मग निसर्गनियम काय आहे हे पाहण्यासाठी आपण
प्राण्यांच्या वागणुकीकडं पाहू लागतो.
अनेकजण याच कारणानं माणसाविषयी बोलताना
प्राणिजगतातली अनेक उदाहरणं घेतात. पण इथे एक गंमत होते. पुरुषाचं वर्चस्व हा
निसर्गनियम आहे असं माझ्या मनानं आधीच ठरवलेलं असलं तर माझ्या म्हणण्याच्या
समर्थनार्थ प्राणिजगतातली डझनावारी उदाहरणं मी देऊ शकीन. या उलट, निसर्गतः
पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ असा निष्क़र्ष आधीच काढून त्याला अनुकूल उदाहरणं
शोधायला बसता येईल, आणि इथंही भरपूर उदाहरणं मिळतील. म्हणून असा काही प्रयत्न
करण्यापूर्वी आपल्याला आधी असं विचारायला हवं की प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास
आपल्याला आपले आजचे प्रश्न सोडवायला काही मदत करणार आहे का? असेल तर कशा प्रकारे?
प्राण्यांच्या
नर–मादी संबंधांमध्ये अगणित तर्हा आहेत. गंमतीची गोष्ट ही की कधी नियम म्हणून
असेल तर कधी अपवाद म्हणून असेल पण या सगळ्या तर्हा माणसामध्येही दिसतात.
जेव्हा प्राण्यांच्या आणि माणसाच्या एखाद्या वागणुकीत
साम्य दिसतं तेव्हा ते योगायोगानं दिसणारं वरवरचं साम्य असतं की अधिक खोलवरचं? कधी
कधी अगदी वेगळ्या कारणांनी सारखे दिसणारे परिणाम घडू शकतात. अशा वेळी या घटनांमधलं
साम्य वरवरचं असतं. जेव्हा प्राणी माणसासारखे अथवा माणूस प्राण्यासारखा वागतो असं
दिसतं तेव्हा त्या वागणुकीमागच्या प्रेरणाही सारख्या असतात की वेगळ्या?
या
प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर मिळण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही. कारण एखाद्या
प्राण्याला काय ‘वाटतं’ ते आपल्याला कळू शकत नाही. तो प्राणी कसं वागतो तेवढं फक्त
दिसू शकतं. यामुळेच प्राण्यांच्या स्वभावाचा अभ्यास हा प्राण्यांच्या वागणुकीचा
अभ्यास होऊन बसला. प्राण्यांच्या स्वभावशास्त्राचे अभ्यासक राग, द्वेष, प्रेम,
हेतू हे शब्द वापरणं शक्यतो टाळतात. याचा अर्थ प्राण्यांना या भावना नसतातच असं
नाही. पण ज्या गोष्टी दाखवता येत नाहीत, मोजता येत नाहीत
त्याविषयी विज्ञान साधारणपणे मौन बाळगतं. मग प्राण्यांच्या वागणुकीचे अर्थ कसे
लावले जातात? तर ते उत्क्रांतिशास्त्रातल्या सिद्धांताच्या प्रकाशात लावले जातात.
प्राण्यांची शरीरं जशी उत्क्रांतीच्या प्रक्रियेनं घडवली तशी त्यांची वागणूकही.
आणि उत्क्रांतीचं सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे, ‘जो जगायला लायक आहे, तोच जगेल’.
मग जे अवयव विशिष्ट परिस्थितीत जगायला लायक बनवतील ते विकसित होतील. तसंच ज्या
वगणुकीनं त्या प्राण्याची जीवनक्षमता वाढेल ती वागणूक त्या प्राणी जातीमध्ये
रुजलेली दिसेल. जी पक्षीण अंड्यांची आणि पिलांची नीट काळजी घेईल तिची जास्त पिलं
जगतील, सुदृढ होतील. जी असं करणार नाही तिचा वंशच खुंटेल.
हीच
गोष्ट आपण माणसात कशी पाहतो?
आई
आपल्या मुलांची काळजी का घेते, त्यांच्यासाठी खस्ता का खाते, तर तिचं त्यांच्यावर
प्रेम असतं म्हणून. हे प्रेम करताना आपला वंश वाढेल का किंवा आपल्यातली किती जनुकं
पुढच्या पिढीत उतरतील याचा हिशेब त्या आईच्या मनात नसतो. ही गोष्ट आपल्याला
अनुभवानं माहिती आहे. मग ही आई आणि पिलांची काळजी घेणारी पक्षीण यांच्या
वागणुकीमधलं साम्य हे वरवरचं आहे की खोलवरचं? माणसाच्या आणि प्राण्यांच्या वागणुकीची
तुलना करणं कितपत बरोबर आहे? आणि असा तुलनात्मक अभ्यास केल्यानं काही फायदा होईल
का?
माझ्या मते तरी नक्कीच होईल. किंबहुना माझी अशी
खात्री आहे की प्राण्यांची वागणूक थोडीतरी समजून घेतल्याशिवाय मनुष्य स्वभावातल्या
खाचाखोचा समजतील हे संभवतच नाही. प्राण्यांच्या स्वभावाचा अभ्यास केलेले अनेक तज्ञ
या मताशी सहमत होतील, होतात असं मी पाहिलं आहे. मात्र माणसाचा अभ्यास करणारे
म्हणजे मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादींचे अभ्यासक याच्याशी फारसे सहमत असत
नाहीत. मला वाटतं याचं कारण असं असावं की प्राण्यांच्या अभ्यासकांना आपल्या
अभ्यासातून प्राण्यांची आणि आपल्या अनुभवातून माणसांची माहिती असते. त्यामुळे
त्यातला समान धागा त्यांच्या पटकन ध्यानात येऊ शकतो. याउलट
केवळ माणसांचा अभ्यास जे करत असतील त्यांचं ज्ञान एकांगी असू
शकतं. प्राण्याबद्दल काही अर्धवट, वरवरची, ऐकीव माहिती असल्याचा फायद्यापेक्षा
तोटाच जास्त होतो.
हा
मुद्दा तत्त्वतः अनेकांना मान्य होईल. तरीसुद्धा प्राण्यांच्या वागणुकीला जे
तर्कशास्त्र लावलं जातं ते माणसाला लावायला भलेभले शास्त्रज्ञसुद्धा कचरतात. याची
कारणं अनेक आहेत. एक म्हणजे माणसाचा
आणि प्राण्यांचा अभ्यास करण्याच्या आपल्या पद्धती
वेगळ्या आहेत आणि त्या तशा राहणार हे उघड
आहे. पण वेगळ्या पद्धती वापरल्यामुळे
चित्र वेगळं दिसू शकतं. आणि पद्धतींमुळे पडलेले फरक खरेच आहेत्त असं मानण्याचा मोह होतो.
एखाद्या
वागणुकीमागची कारणं शोधायची म्हटली तर हे काम निरनिराळ्या पातळीवर होऊ शकतं. उदाहरणार्थ
काही जातीचे सरडे आजूबाजूच्या परिसराप्रमाणे रंग बदलतात. सरड्यांनी रंग का बदलला
असा प्रश्न विचारला तर त्याचं कारण असं सांगता येईल की आजूबाजूची परिस्थिती बदलली
म्हणून. दुसरं कारण असं सांगता येईल की कातडीखालच्या शाईपेशी आकुंचन किंवा प्रसरण
पावल्या म्हणून रंग बदलला. तिसरं कारण असं की विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट रंग धारण
करण्याच्या गुणधर्मामुळे सरडे आपलं संरक्षण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात.
त्यामुळे असा गुणधर्म असणारे सरडे असं करू न शकणार्यांपेक्षा वरचढ ठरले.
त्यामुळे असा गुणधर्म स्थिरावला. यातल्या पहिल्या दोन कारणांच्या पातळ्या तात्कालिक आहेत (proximate
causes) तर
तिसरं खरं मूळ कारण (ultimate
cause) म्हणता
येईल.
साधारणपणे
प्राण्यांच्या वागणुकीचे अभ्यासक मूळ कारणाला जास्त महत्त्व देतात तर माणसाच्या
वागणुकीच्या अभ्यासात तात्कालिक कारणांना आजवर जास्त महत्त्व दिलं गेलं आहे.
वागणुकीचा अर्थ लावण्याच्या पद्धतीतले हे फरक आहेत. पण यामधून, माणूस जे काही वागतो त्याचा जन्म विचार
आणि भावनांमधून होतो आणि प्राणी जसं वागतात त्याच्यामागे हे असलं काही नसतं, तर फक्त उत्क्रांतीचं
स्वच्छ शुद्ध गणित असतं; हा
प्राण्यांच्या आणि माणसाच्या वागणुकीतला मुख्य
फरक आहे, असा एक गैरसमज रुजला गेला आहे.
माणसाच्या स्वभावाकडे
उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून न बघण्यामागे दुसरं एक कारण आहे. डार्विननंतरच्या
एकोणीसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात डार्विनचे सिद्धांत
अर्धेकच्चे आणि संदर्भ सोडून मानवी
समाजाला लावण्याचा प्रयत्न झाला. त्यातून ‘सोशल डार्विनिझम’, सुप्रजनन - ‘यूजेनिक्स’ यांसारखी
प्रकरणं निघाली. आणि या अर्ध्याकच्च्या तत्त्वज्ञानांचा वंशवादी आणि शोषणवादी
लोकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. यावर नंतरच्या काळात इतकी टीका झाली की
डार्विनवाद आणि मानवी समाज हे शब्द एकत्र आणायला सुद्धा लोक घाबरू लागले.
तिसरं कारण असं की प्राण्यांविषयी
बोलताना आपण त्रयस्थपणे विचार करू शकतो. पण आपला संबंध आला की आपल्या
भावना आणि आपल्या श्रद्धा या बहुधा आपल्या तर्कशास्त्रावर मात करतात. प्राण्यांविषयी
एखादा नवा सिद्धांत मान्य करायला आपलं काही जात नाही. पण माणसाविषयी असं काही
करण्यात आपल्या आयुष्यात आपण जी तत्त्वं, जी मूल्य आधारभूत मानली त्याला धक्का लागून आपल्या
पायाखालची वाळू घसरल्यासारखी वाटली तर नवल
नाही.
गेल्या तीस वर्षांत
उत्क्रांतीशास्त्रात इतके नवेनवे आणि सुंदर सिद्धांत मांडले गेलेत की त्यांनी आता
या विज्ञानशाखेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. पण या घडामोडी सामान्य माणसापर्यंत
पोहोचलेल्या नाहीत. आपल्याकडे तर नाहीच नाहीत. पण जीवशास्त्रातल्या या
नवनवीन सिद्धांतांनी जीवनाचा इतक्या बारकाईनी विचार करायला सुरूवात केली आहे, इतकी
सुंदर गणितं मांडली आहेत की त्यांच्या प्रेमात पडावं. पण हे सिद्धांत मांडणारे
शास्त्रज्ञ सुद्धा माणसाबद्दल बोलायला बिचकतात.
विल्यम हॅमिल्टन हा एक
ब्रिटिश शास्त्रज्ञ. 1964 साली वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी त्याने जो एक
छोटासा निबंध लिहिला तो गेल्या तीस वर्षांतल्या सैद्धांतिक घडणींना पायाभूत ठरला. माझ्या सुदैवानं तो तीन वेळा भारतात आला. त्या तीनही वेळेला
त्याला भेटण्याचा योग आला. त्यापैकी एकदा
हा साधा माणूस आमच्या घरी राहून जेवूनही गेला. अनेक विषयांवर हॅमिल्टनशी चर्चा
करायला मिळाली.
एकदा मी असं विचारलं की
तुमच्या मते माणूस इतर प्राण्यांपेक्षा इतका वेगळा आहे का की आपण प्राण्यांच्या
वागणुकीचे अर्थ लावताना ज्या प्रकारचं तर्कशास्त्र किंवा ज्या प्रकारच्या
विचारपद्धती वापरतो त्या माणसालाही लागू करायला काही हरकत आहे. हॅमिल्टननं
थोडक्यात पण मासलेवाईक उत्तर दिलं, ‘असा विचार जरूर करा. पण त्यावर काही लिहू नका.
लिहिलंत तर संकटात सापडाल.’
हॅमिल्टनचा हा सल्ला मी
मोडणार आहे. कारण एकतर हॅमिल्टनला माहीत नसावं की लेखनस्वातंत्र्य जेवढं भारतात
आहे तेवढं कदाचित जगाच्या पाठीवर कुठंही नाही. इथं तुम्ही तुमची मतं प्रामाणिकपणे
मांडत असाल तर तो छापणाराही भेटतो, वाचणाराही भेटतो, वादविवाद करणारेही भेटतात –
खुल्या मनानं. दुसरं म्हणजे पाश्चिमात्य समाजाचं जे पारंपरिक तत्त्वज्ञान आहे
त्यात माणसाला फार वेगळं स्थान आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा माणूस फार स्पेशल
आहे. देवानं माणसाला ‘स्वतःच्या प्रतिमेत’ घडवलं. या उलट आपल्या
तत्त्वज्ञानात एकच आत्मा सगळ्या
योनींमध्ये फिरतो. त्यामुळे माणसाचा आणि प्राण्यांचा आत्मा काही वेगळा नसतो. आता
आज भले आपण आत्मा बित्मा न मानणारे असलो, तरी या गोष्टीचा संस्कार कुठेतरी उमटलेला असतोच.
त्यामुळे प्राण्यांची आणि माणसांची तुलना पाश्चिमात्य समाजाला जेवढी आक्षेपार्ह
वाटते तेवढी भारतीय समाजाला नक्कीच वाटणार नाही.
पण अशा काही तुलनेतून
आपल्याला साधायचं आहे काय? साधायचं आहे हे की आपणच आपल्याला नीट समजू शकलो
पाहिजे.
आपण जेव्हा कोणत्याही
गोष्टीचा विचार करतो तेव्हा आपण काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. अर्थात
असं करावंच लागतं. कारण गृहितांशिवाय कोणतंही प्रमेय मांडताच येत नाही. पण शहाणपणाची
गोष्ट ही की जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण ही गृहितं तपासून पाहिली पाहिजेत.
किमानपक्षी ‘ही गृहितं तपासून पाहिलीत का? ती बरोबर आहेत कशावरून?’
असा कुणी प्रश्न केला तर त्यावर चिडू नये.
‘स्त्री-पुरुष संबंध’ या अनेकांच्या दृष्टीनं
स्फोटक अशा विषयात शिरलं तर अनेक प्रकारच्या मतांना चिकटून माणसं अनेक प्रकारची
विधानं करत असतात. या प्रत्येक मतांमागे काही गृहितं असतातच. ‘बायकांना
अक्कल नसते’, असं एक पारंपरिक पुरुषी गृहीतक आहे. या उलट शारीरिक
बळ सोडलं तर स्त्री-पुरुषांमध्ये कोणताही फरक
नाही, किंवा स्त्री श्रेष्ठ आहे असा कुणाकुणाचा दृढ
विश्वास असतो. र. धों. कर्व्यांनी असं लिहिलं आहे की,
स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य असावं,
पण प्रत्येक बाबतीत पुरुषांशी
बरोबरी करणं हे अनैसर्गिक आहे.
या मतामागेही एक गृहीत आहे की
निसर्गतः स्त्री-पुरुषांच्या जडणघडणीत मोठे फरक आहेत.
आपण बलात्काराविषयी बोलत असू,
वेश्याव्यवसायाविषयी बोलत असू अथवा एकूण सामाजिक विषमता,
न्याय-अन्याय याविषयी बोलत असू, आपली गृहितं तपासून पाहिली पाहिजेत. ज्या पायावर आपण आपली विधानं करतो तो आला कुठून हे समजलं
पाहिजे. निदान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानं काय होईल? एक
शक्यता म्हणजे आपला पाया अधिक बळकट होईल. तसं झालं तर अर्थात आपल्याला आनंदच होईल.
दुसरी शक्यता म्हणजे आपला पाया ढासळून पडेल आणि आपलं सगळंच तत्त्वज्ञान कोलमोडून
पडेल. असं काही झालं तर ते पचवायला कठीण असतं. पण स्वतःला बुद्धीवादी म्हणवणार्यांनी
त्याची तयारी ठेवली पाहिजे. पण याच्या मधली तिसरी अवस्था मला जास्त संभाव्य वाटते.
आपल्या गृहितांपैकी काही कदाचित हलवून बळकट होतील, काही थोडी चुकीची सिद्ध
होतील, आणि काही शंकास्पद राहतील. मग या शंका मिटवण्यासाठी पुन्हा आणखी
अभ्यास, आणखी विचार, आणखी निरीक्षणं, आणखी विश्लेषण करावं लागेल.
यातून काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण काही नवे प्रश्नही उभे राहतील. नव्या प्रश्नांची उकल
करण्याच्या नादात काही नव्या पद्धतीही सापडतील... असं चालू राहील. चालू राहिलं
पाहिजे. वैज्ञानिक मनोवृत्तीचं मुख्य लक्षण हेच की कोणतंही गृहीत, कोणताही
सिद्धांत ‘अंतिम’ न मानणं. सतत प्रश्न करणं. सगळ्या प्रश्नांना तयार
उत्तरं नसतात. पण तशी असती तर सगळी मजाच
गेली असती.
या लेखाच्या सुरुवातीला आपण
प्राण्यांमधल्या स्त्री-पुरुष संबंधांचे ... हवं तर नर-मादी म्हणा, काही
थोडे नमुने पाहिले. मग असं म्हटलं की या प्रत्येकाच्या जवळपासात जाणारी उदाहरणं
आपल्याला माणसातही दिसतात. आता प्राण्यांच्यापुरता आपल्याला आधी असा प्रश्न
विचारला पाहिजे की ही विविधता का दिसते? काही प्राणी असे
वागतात, काही तसे वागतात. असं का?
मग आपण असं पाहू शकतो की या
विविधतेतही आपल्याला काही समान धागे, काही सहसंबंध शोधता येतात का?
उदाहरणार्थ, काही जातींमध्ये नर मादीपेक्षा मोठा आणि बलवान असतो
तर काही जातींमध्ये मादी मोठी आणि प्रबळ असते. या पैकी कोणते प्राणी पहिल्या
प्रकारचे आणि कोणते प्राणी
दुसर्या प्रकारचे आहेत त्याची यादी
करावी लागेल. मग पहिल्या प्रकारातल्या प्राण्यांचे इतर गुणधर्म तपासून त्याची
दुसर्या प्रकारातल्या प्राण्यांशी तुलना करता येईल. त्यातून काही सहसंबंध
सापडतील. उदाहरणार्थ, उष्ण रक्ताच्या प्राण्यांमध्ये जिथे जिथे एक नर एक मादी असे बरोबरीनं पिलांची काळजी घेतात तिथे नर-मादी आकारानी आणि रंगांनी सारखेच
दिसतात किंवा मादी नरापेक्षा मोठी असते. या उलट ज्या ज्या प्राण्यांमध्ये मादीवर
पिलांची जबाबदारी टाकून नर निघून जातो
अथवा एक नर अनेक माद्या बाळगतो त्या जातींमध्ये नर मादीपेक्षा अधिक मोठा किंवा
अधिक आकर्षक रंगाचा असतो. असे काही सहसंबंध शोधणं ही आपली पहिली पायरी असेल. या
सहसंबंधाना अर्थातच ‘का’ हा प्रश्न विचारता येईल. असं करत गेलं की तर
प्राण्यांच्या वागणुकीतल्या अथांग विविधतेतूनही सुसंगत नियम सापडू शकतील. एक ढोबळ
नियम असा सांगता येतो की प्राणी ज्या परिस्थितीत उत्क्रांत झाला ती परिस्थितीच
त्या प्राण्याची जीवनपद्धती, शरीररचना आणि वागणूक ठरवते.
इथेच आपल्याला माणसापर्यंत
येणारी तर्कशुद्ध वाट सापडते. माणूस कोणत्या परिस्थितीत उत्क्रांत झाला? आणि
त्या परिस्थितीत कुठल्या प्रकारची वागणूक उत्क्रांत होणं अपेक्षित आहे?
प्रत्यक्षात ती तशी असल्याचे काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे मिळतात का?
प्राण्यांवरून माणसांच्या
वागणुकीचं मूळ शोधताना एक चूक होण्याची दाट शक्यता आहे. अनेकजण अशी मांडणी करतात
की बहुसंख्य प्राण्यांमध्ये जो दिसतो तो ‘नियम’, अल्पसंख्य तो ‘अपवाद’; मग जो ‘नियम’
तो माणसाला लागू करा. पण माणूस हा त्या नियमातल्यापैकीच आहे,
अपवादापैकी नाही हे कशावरून? एक साधं उदाहरण घेऊ. बहुतेक प्राण्यांमध्ये आकर्षक
असतो तो नर. मादी नव्हे. म्हणजे नराची आकर्षकता हा नियम. यावरून असं म्हणण्याचा
मोह होतो की माणसामध्ये स्त्री-सौंदर्याला जे महत्त्व दिलं जातं ते अनैसर्गिक आहे.
पण प्राण्यांमध्येसुद्धा नर आकर्षक असतो या नियमाला अपवाद आहेतच. नर मळकट, मादी
रंगीत अशा जाती आहेत. माणूस हा त्या बहुसंख्य ‘नियम’वाल्यांमध्ये
बसतो की अल्पसंख्य ‘अपवाद’ वाल्या जातींमध्ये, हे कसं ठरवायचं? त्यासाठी नियम का आला आणि अपवाद का निर्माण झाले ते पाहिलं
पाहिजे. मग अमुक एका परिस्थितीत आकर्षक, नटवे नर आणि तमुक परिस्थितीत नटव्या माद्या असा काही
नियम सांगता येतो का ते पाहावं लागेल. मग यापैकी माणूस कोणत्या परिस्थितीत
उत्क्रांत झाला ते पाहिलं की स्त्री सौंदर्याचं महत्त्व नैसर्गिक का कृत्रिम ते
सांगणं शक्य होईल. असा खोलवर पद्धतशीर विचार न करता घाईघाईनं काढलेली तात्पर्यं
आपल्याला चुकीच्या मार्गावर नेण्याची शक्यता आहे.
प्राण्यांच्या उत्क्रांतीचे
नियम माणसाला लावण्याची ही पद्धत तर्कशुद्ध असली तरी ती परिपूर्ण नाही. हा विचार
झाला उत्क्रांत होत असलेल्या माणसाचा. पण ज्या परिस्थितीत माणसाची उत्क्रांती झाली
त्यापेक्षा खूपच वेगळ्या परिस्थितीत आज आपण जगतो आहोत. खूप वेगळी जीवनपद्धती आपण
अंगिकारलेली आहे. यातून कोणत्या प्रकारचे बदल होणं अपेक्षित आहे? आजच्या
माणसाच्या वागण्यात नागडा आदीमानव किती प्रमाणात आणि सुसंस्कृत सुटाबुटातला किती
प्रमाणात दिसतो? आपल्या वागण्यात अंतप्रेरणेचा भाग किती आणि शिकून,
संस्कारांनी अथवा विचारपूर्वक आलेला किती?
या शेवटच्या पायरीवर
आपल्याकडे आज तरी उत्तरापेक्षा प्रश्नच
जास्त आहेत. पण जगभर या विषयावर आज वेगानं
संशोधन चालू आहे. आपल्या वागण्याचे नवे अर्थ आपल्याला लागू शकतील अशी परिस्थिती
निर्माण होते आहे. यासाठी वापरली जाणारी तर्कपद्धती कशी असते, कशी
असावी याचं एक रेखाटन तेवढं मी या लेखात केलं आहे. तपशिलात मुद्दामहूनच शिरलो
नाही. या पद्धतीनं विचार केला तर स्त्री-पुरुष संबंधच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक अंगाचा एक नवा अर्थ आपल्याला लागत जाईल. त्यासाठी अर्थातच
आपल्याला एकेका विषयाच्या सूक्ष्म तपशिलात शिरावं लागेल.
या लेखमालेत आपल्याला विचार
करायचा आहे तो स्त्री-पुरुष संबंधांच्या उत्क्रांतीचा.
मराठीत या विषयावर लिहायचं तर ‘मिळून सार्याजणी’ च्या वाचकाएवढा चांगला वाचक
आणखीन कुठं मिळेल? माझ्या मनात या विषयावर लिहायचं घोळत होतं त्याच वेळी
‘मिळून सार्याजणी’नी नेमक्या याच विषयावर लिहिण्याची सूचना केली. यावर आपण
आपलं आपल्यालाच great men think
alike असं म्हणून घेऊ आणि खुल्या मनानं, खुल्या बुद्धीनं
यावर बोलू... पुढल्या अंकापासून.
Comments
Post a Comment